Posted in कळसुत्री

‘अजिबोगरीब’ पेडणे मतदारसंघाचे मतदार 

कळसुत्री भाग ८

प्रत्येक मतदारसंघात मतदारांची समीकरणे वेगळी आहे. गोव्यातील मतदारांना सरसकट एकाच सूत्रात बांधता येत नाही. स्थानिक पातळीवरील राजकारणातील ‘मेख’ ज्याला समजते तोच तिथल्या राजकारणात अग्रेसर राहतो. गोव्यातील चाळीस विधानसभा मतदारसंघात फक्त पेडणे मतदारसंघ सोडला तर बाकी सगळ्या ठिकाणी स्थानिक उमेदवाराला महत्व असते. पेडणे हा सर्वार्थाने वेगळाच मतदारसंघ वाटतो. इथले मतदार देखील ‘अजिबो गरीब’ पद्धतीचे. शेजारचा धारगळ मतदारसंघ २०१२च्या निवडणुकीच्या वेळी पेडणे मतदारसंघात विलीन झाला आणि इथली राजकीय गणितं बदलू लागली पण मतदारांची मानसिकता होती तशीच राहिली. २००७ च्या पूर्वी धारगळ मतदारसंघाचा निवडणूक पूर्व सर्व्हेक्षणात कधी समावेश नसायचा. मनोहर आजगावकर यांचा बालेकिल्ला त्यामुळे याला भाजपने याचा समावेश सर्व्हेक्षणांमध्ये केला नव्हता. पण २०१२च्या निवडणुकीत अनेक गणितं बदलत होती तसे पेडणे आणि धारगळ हे दोन मतदारसंघ एक झाल्यामुळे आता इथली परिस्थिती बदलू शकते का? हे बघण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करून आढावा घेण्याचा प्रयत्न सुरु झाला. हे काम देखील आमच्याकडे आले.

आमच्या संस्थेचे अध्यक्ष यशवंत ठकार आणि मी इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करायला सुरुवात केली तेव्हा सर्वसामान्य मतदार सुद्धा या नवीन बदलांमुळे उत्सुक होते. पण इथेही सांगे मतदारसंघाप्रमाणे अनुभव येऊ लागला. या भागातली काही ठराविक मंडळी आम्हाला भेटून सतत एका नव्या उमेदवाराचे नाव सांगत होते. हे नाव ऐकून आम्हालाच काय पण खुद्द त्या उमेदवाराला देखील आश्चर्य वाटू लागले आणि हे नवे उमेदवार होते राजेंद्र आर्लेकर. 
धरगाळ मतदारसंघाला कायम स्थानिक पेक्षा बाहेरच्या उमेदवाराचे आकर्षण राहिले आहे मग हा मतदारसंघ पेडणे मतदारसंघात विलीन झाला तरी यात बदल झाला नाही. मनोहर आजगावकर हे मडगावचे. पण धारगळ मतदारसंघातून जिंकून येणारे. पेडणे मतदारसंघ अनुसूचित जातींच्या उमेदवारांसाठी राखीव झाला आणि इथल्या स्थानिक उमेदवारांची सद्दी संपली. बाहेरून आलेल्या उमेदवारांना महत्व आले. यात २०१२ ला काहीच संबंध नसताना अचानक राजेंद्र आर्लेकर यांचे नाव येऊ लागल्याने सर्वच स्तरावर आश्चर्य व्यक्त केले गेले. खुद्द राजेंद्र आर्लेकर यांना वास्को मतदारसंघ सोडून पेडणे मतदारसंघात जावे कि नाही याबाबत संभ्रम होता. 

संघाचे स्वयंसेवक असणारे आणि जनसंघाच्या काळापासून कार्यरत असणारे राजेंद्र आर्लेकर हे भाजपमधील महत्वाचे नेते. आपला हातचा मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघात काम करणे तसे अवघड. पण २०१२ ला राजेंद्र आर्लेकर यांच्यासमोर पर्याय देखील नव्हता. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी वास्को मधला उमेदवार बदला म्हणून मागणी करायला सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर पेडणे मतदारसंघातील कार्यकर्ते राजेंद्र आर्लेकर यांना पेडणेमधून उमेदवारी द्या असे म्हणत मागे लागले होते. वेगाने घडणाऱ्या घडामोडी बुचकळ्यात टाकणाऱ्या होत्या. उमेदवार आपले नाव सर्वात पुढे राहावे म्हणून ‘लॉबिंग’ करतात हे समजू शकते पण आता ठराविक मतदार ठराविक उमेदवारासाठी ‘लॉबिंग’ करतात तेव्हा मात्र अनेक प्रश्न पडतात. ‘बाहेरचाच उमेदवार का?’ यावर सविस्तर चर्चा करून अहवाल द्यायला सांगण्यात आला.

१. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्यामुळे स्थानिक पातळीवर तसा योग्य उमेदवार नाही.  

२. स्थानिक पातळीवरील एकही उमेदवार निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करू शकणार नाहीत. 

३. स्थानिक उमेदवाराला स्थानिक लोक ‘आतून बाहेरून’ व्यवस्थित ओळखतात त्यामुळे ते त्याला महत्व देत नाहीत.  

४. म्हणून आम्हाला आयात केलेलाच उमेदवार हवा.  

अशी असंख्य कारणे पुढे आली. बाहेरच्या मतदारसंघातून उमेदवार आयात करायचा आणि त्याचा कंटाळा आला, त्याने यांची वैयक्तिक कामे केली नाहीतर त्याला सोडून परत नव्या ‘आयात’ केलेल्या उमेदवाराला बोहल्यावर चढवायचे प्रयत्न सुरु करायचे. हे या मतदारसंघात सुरूच असते. आपला मतदारसंघ सोडून दुसऱ्याच मतदारसंघात निवडणूक लढवणे सोप्पे नाही. पण राजेंद्र आर्लेकरांनी पेडणेकरांची विनंती स्वीकारली आणि २०१२ ला आर्लेकर पेडणे मतदारसंघातून निवडून आले. यात सर्व शक्यता मांडणारा एक युवा कार्यकर्ता होता. आर्लेकरच का? यावर त्याने त्याच्या पद्धतीने मांडणी केली होती. त्याचे म्हणणे होते राजेंद्र आर्लेकर भाजप मधील महत्वाचे आणि ज्येष्ठ नेते आहेत. २०१२ ला भाजपचे सरकार बनणार असे वातावरण होते. यात जर आर्लेकरांनी पेडणे मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकून आले तर त्यांना सरकारमध्ये महत्वाचे मंत्रिपद मिळेल. ज्यामुळे पेडणेवासीयांचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटू शकतील. विशेषकरून त्याच्यासारख्या युवकांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल. त्याची ‘थिअरी’ छान होती. निवडणुकीवेळी तो राजेंद्र आर्लेकरांसोबत होता. निवडणूक संपली आमचे काम देखील संपले. आर्लेकर आधी सभापती मग वन- पर्यावरण मंत्री झाले. आता तर ते बिहारसारख्या महत्वाच्या राज्याचे राज्यपाल आहेत. २०२२ च्या निवडणुकीच्या वेळी पेडणे मतदारसंघासाठी उमेदवारांची इतकी वेगवेगळी नवे ऐकायला येत होती आणि यात परत बाहेरच्याच नव्या नावांचा गाजावाजा होता. त्यावेळी तो ‘थिअरी’ मांडणारा युवा कार्यकर्ता आठवला. २०२२ च्या निवडणुकीत तो परत आपली ‘थिअरी’ घेऊन नव्या उमेदवाराच्या मागे गेला नसेल ना? 

मनस्विनी प्रभुणे नायक 

https://gathanmala.wordpress.com

https://streetfoodinindia.wordpress.com

https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in कळसुत्री

उमेदवारांचे ‘लॉबिंग’

कळसुत्री भाग -७


काही मतदारसंघातील मतदारांची मानसिकता फारच वेगळी आहे. विद्यमान आमदार राजकरणात सक्रिय असताना निवडणूक जवळ येताच त्याच पक्षासाठी कोणा दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी मिळावी म्हणून हि मंडळी प्रयत्नशील असतात. स्वतःला त्या विशिष्ठ पक्षाचे प्रामाणिक, सच्चे कार्यकर्ते म्हणवून घेतात. असा गट प्रत्येक मतदारसंघात कार्यरत असतो. त्यांची एकनिष्ठता पक्षाशी असते कि ज्याचे नाव ते पुढे करत असतात त्या उमेदवाराशी असते असा प्रश्न पडतो. आजवर सांगे, पेडणे आणि सालीगाव या मतदारसंघांनी याबाबत वेगळी उदाहरणे आपल्या पुढे ठेवली आहेत. 

हि २०१० सालची  गोष्ट. दोन वर्षात विधानसभा होणार होत्या. महालक्ष्मी ट्रस्टच्या माध्यमातून सांगे मतदारसंघातील महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे काम मी बघत होते. त्यावेळी महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर पर्रीकर होते. महिलांचे प्रशिक्षण झाल्यावर एक छोटेखानी कार्यक्रम व्हायचा त्यात महिलांना महालक्ष्मी ट्रस्टचे प्रमाणपत्र दिले जायचे आणि या कार्यक्रमासाठी खुद्द मनोहर पर्रीकर स्वतः यायचे, महिलांशी संवाद साधायचे. असे प्रशिक्षण कार्यक्रम आम्ही पेडणे ते काणकोण पर्यंत केले. पण फक्त भाजपचे आमदार आहेत त्याच मतदारसंघात हे व्हायचे. तर सांगेमधल्या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर काही महिला आणि काही पुरुष तिथे भेटायला आले आणि ‘आम्हाला मनोहरभाईंना भेटायचे आहे. खूप महत्वाचे काम आहे.’ असे सांगू लागले. त्यावेळी सांगे मतदारसंघात वासुदेव मेंग गावकर हे भाजपचे आमदार होते. अतिशय साधेसुधे व्यक्तिमत्व. भाजपतलेच काहीजण ‘याच्या तोंडावरची माशी देखील हालत नाही’ असे म्हणत त्यांची चेष्टा करायचे. या भेटायला आलेल्या कारकर्त्यांचे काम काय होते तर त्यांना येऊ घातलेल्या निवडणुकीत वासुदेव मेंग गावकर ऐवजी आणखी कुणा नव्या नावाची शिफारस करायची होती. वासुदेव मेंग गावकर जे विद्यमान आमदार होते पण त्यांना तिकीट न देता खाणींशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या एका बड्या उमेदवाराला तिकीट मिळावे म्हणून हि मंडळी प्रयत्नशील होती. त्यावेळचे संघटनमंत्री सतीश धोंड यांना भेटा असे सांगून मी त्यातून अंग काढून घेतले. सतीश धोंड यांच्यासोबत त्यांची मिटिंग अयशस्वी ठरली. 

अशा पद्धतीने काही ठराविक लोक एखाद्या व्यक्तीचे नाव पुढे करत असतील तर त्याकडे थोडे संशयाने बघितले जाते. काहीतरी स्वार्थ आहे असे समजले जाते. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या बऱ्यापैकी मोठी होती. नव्या उमेदवाराचे ‘लॉबिंग’ करण्यात महिला देखील मागे नव्हत्या. या मंडळींना वासुदेव मेंग गावकर का नको? हा प्रश्न होताच. ‘ते फारच साधे आहेत. आमदार कसा आक्रमक असला पाहिजे. आमची कामे व्हायला हवीत.’ असली काहीतरी उत्तरे त्यांच्याकडून येत होती. निवडणुकीला एक वर्ष बाकी असताना सर्व मतदारसंघात उमेदवार निश्चितीसाठी सर्व्हेचे काम सुरु झाले. तोवर मी या सगळ्या मंडळींना विसरून गेले. पण सरून गेलेल्या काही महिन्यातच हा गट सांगे मतदारसंघात व्यवस्थित कार्यरत झाला होता. त्यांनी ‘वासुदेव मेंग गावकर नको’ अशी मोहीम उघडली. जेव्हा प्रत्यक्ष उमेदवार निश्चितीचा सर्व्हे करण्याची वेळ आली तेव्हा वासुदेव मेंग गावकर यांच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना तयार करण्यात आल्याचे दिसून आले. शेवटी या मतदारसंघात सर्व्हे करून काही फायदा नाही. इथल्या कार्यकर्त्यांनी आपले मत आधीच तयार करून ठेवले आहे हे अगदी ठळकपणे दिसून येत होते.

कार्यकर्ता साधासुधा असणे, प्रामाणिक असणे, त्याने कार्यकर्त्यांना वेळ देणे हे एकेकाळी गुण समजले जायचे पण हेच आता दोष ठरू लागले. सांगे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांना आता नव्या उमेदवाराची भुरळ पडली होती. हि मंडळी याच नव्या बड्या असामीला तिकीट मिळावे यासाठी हातून बसले होती. सगळ्या मतदारसंघातील उमेदवार निश्चितीचे सर्व्हे पूर्ण झाले पण सांगेचा निर्णय होत नव्हता. या नव्या उमेदवारासाठी सांगेतील भाजप कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे पणजीतीळ मुख्यालय गाठले. ‘आमच्यावर उमेदवार लादू नका’ अशा प्रकारची भूमिका यासर्वांनी घेतली. यापार्श्वभूमीवर २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत आर्थिकदृष्ट्या तगड्या उमेदवाराला भाजपला कसे तिकीट देणे भाग पडले हे सांगायला नको. नशिबाने हा उमेदवार त्यावेळी जिंकून आला. २०१२ च्या निवडणुकीत ‘पर्रीकरांचा’ करिष्मा होताच. त्यावेळी राजकारणात आणि भाजपमध्ये अनेक नव्या चेहऱ्याचा उदय झाला. सलग दोन वेळा जिंकून येऊन त्यातला बराचसा काळ विरोधी पक्षात बसण्यात गेलेल्या वासुदेव मेंग गावकर यांना मात्र मतदार लवकर विसरले.  


मनस्विनी प्रभुणे नायक 

https://gathanmala.wordpress.com

https://streetfoodinindia.wordpress.com

https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in कळसुत्री

कॅसिनो आणि पणजीकर  

कळसुत्री भाग ६

गोवा भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या एकेकाळी ‘रणरागिणी’ होत्या. आता नाहीत का? असे तुम्ही म्हणाल. असतील ही कदाचित. पण आता त्यांना पूर्वीसारखा संघर्ष करावा लागत नाही. भाजपच्या पूर्वीच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून विविध मुद्द्यांवर जो काही संघर्ष केला. तो आजच्या महिला कार्यकर्त्यांना कळणार नाही. सत्तेवर असताना पक्षासाठी काम करणे सोप्पे. पण विरोधी पक्षात असताना एखादा विषय लावून धरून, त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणे अवघड. २०१० साली भाजपकडे आंदोलन, मोर्चा -धरणे, निषेध करण्यासाठी इतके विषय होते आणि हे सगळे राबवण्यासाठी उत्तम अशा महिला कार्यकर्त्यांची फळी देखील होती.

 पक्षासाठी रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरणाऱ्या कुंदा चोडणकर, नीना नाईक, कृष्णी वाळके, सुवर्णा जांबवलीकर, स्वाती जोशी, शुभदा  सावईकर, मीनाक्षी लवंदे, दीक्षा माईणकर, शिल्पा नाईक यांनी अनेक विषय पेटवते ठेवले होते. हि महिला कार्यकर्त्यांची पिढी भाजपची मोठी शक्ती होती. यांच्या कॅसिनो विरोधी निदर्शनाचा विषय चांगलाच गाजला होता. जेव्हा मनोहर पर्रीकर २०१२ ला मुख्यमंत्री झाले आणि तरीही देखील मांडवीतील कॅसिनो तिथून हालेनात म्हणल्यावर या कार्यकर्तींच्या मनात हलचल सुरु झाली होती. आपण रस्त्यावर का उतरलो होतो? कॅसिनो विरोधी घोषणा देऊन घसा कशासाठी खराब करून घेतला होता? असे विचार यांच्या मनात नक्कीच आले असणार. 

एकीकडे खाण बंदीची लक्षणे तर दुसरीकडे कॅसिनो बंद करण्यासाठी पाऊले उचलायला केलेली सुरुवात. अशा वेळी पणजीतील नागरिकांचे कॅसिनोबद्दल काय मत आहे? हे जाणून घेण्यासाठी मनोहर पर्रीकर यांनी आम्हाला एक सर्व्हे करण्यास सांगितले. यासाठी प्रश्नावली तयार झाली. स्वतः पर्रीकरांनी काही प्रश्न सुचवले. यात भाजपच्या कार्यकर्त्यांना घ्यायचे नाही कारण त्यांचे या विषयावर मत तयार झालेले होते. सामान्य नागरिक पाहिजे, तो या विषयावर काय म्हणतो? हे त्यांना जाणून घ्यायचे होते. काही प्रश्न असे असतात कि त्या संबंधात रोज वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या, पक्षीय पातळीवर होणारी चर्चा ऐकून आपले मत देखील त्याच पद्धतीने तयार होते. पण जेव्हा सामान्य नागरिकांशी यावर चर्चा करण्याची वेळ येते, ज्याचा संबंध यातल्या कोणत्याच व्यवस्थेशी नाही अशा मतदारांशी जेव्हा चर्चा होते तेव्हा त्या प्रश्नांची एक वेगळीच बाजू समजू लागते. कॅसिनो प्रश्नाबाबत असेच झाले. ‘कॅसिनोशी आम्हाला काही देणे नाही. आम्ही काही कॅसिनोमध्ये जात नाही. कॅसिनो तिकडे नदीच्या पात्रात आहेत त्यांचा आमच्या परिसरात काही त्रास नाही.’ अशी उत्तरे पणजीतील नागरिकांनी दिली. शिवाय ‘एकीकडे खाण बंद करणार आणि दुसरीकडे कॅसिनो देखील बंद केले तर सरकारला मिळणारा टॅक्स तर बंद होईल पण बेरोजगारी देखील वाढेल.’ असे देखील काही अभ्यासू नागरिकांनी सांगितले. कॅसिनोमध्ये किती गोमंतकीय तरुण तरुणी आहेत याचा शोध आम्हाला लगेच घ्यावा लागला. बिचोली, अस्नोडा, मये, सान्त इस्तिव्ह, चोडण, वेरे, या भागातील अनेक तरुण कॅसिनोत वेगवेगळ्या कामांसाठी यायचे. त्यावेळी जवळ जवळ साठ टक्के गोमंतकीय तरुण तरुणी कॅसिनोत कामाला होत्या. कॅसिनोंवरचा अहवाल बघून कॅसिनो बंद करण्याचा निर्णय तूर्तास तरी शक्य नाही हे लक्षात आले. मनोहर पर्रीकर यांनी लगेच वित्तीय सचिवांना बोलावून कॅसिनोकडून सरकारी तिजोरीत किती टॅक्स येतो हे देखील पडताळून बघितले. कॅसिनोबाबतचा निर्णय न्यायालयात देखील प्रलंबित होता. मुख्य म्हणजे सामान्य नागरिक असलेल्या पणजीकरांचा त्यावेळी कॅसिनोंना कोणताच विरोध नव्हता हे सत्य सर्वांनाच बुचकळ्यात टाकणारे होते.

खाण बंद झाल्यानंतर आता कॅसिनो बंद करण्याचा निर्णय घेणे भाजपच काय पण अजून दुसरा कोणताही पक्ष असता तर त्यांनाही अवघडच गेले असते. पण कदाचित कॅसिनोबाबतचे तेच प्रश्न आता पणजीकरांना विचारले तर उत्तरे वेगळी येतील. आता मांडवीच्या पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेले असले तरी दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॅसिनोसमोर अगदी तसेच आंदोलन केले. ते बघून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना आपले जुने दिवस आठवले असतील. ज्या मुद्दयांसाठी कधी काळी ते लढत होते तेच मुद्दे घेऊन आता काँग्रेस आणि अन्य पक्ष त्यांच्या विरोधात लढत आहे. ‘कॅसिनो’ हा असाच विषय आहे जिथे वेगवेगळे सरकार आले गेले प्रश्न आहे तिथेच आहे.

मनस्विनी प्रभुणे नायक 

 https://gathanmala.wordpress.com

https://streetfoodinindia.wordpress.com

https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in कळसुत्री

नास्तिक कि आस्तिक?


कळसुत्र भाग – ५



आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये पणजी मतदारसंघातील लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांना पर्रीकरांनी खूपच गांभीर्याने घेतले होते. त्यावर ते परत परत बोलू लागले. मतदार म्हणतात ते सगळे कसे चूक आहे हे सांगायचे. यानंतर त्यांनी पणजी मतदारसंघातील मान्यवर लोकांना भेटायला सांगून जे भाजपचे कार्यकर्ते नाहीत पण त्यांचे मतदार आहेत अशांकडून आपल्या कामगिरीबाबत सूचना मागवल्या. हे काम करत असताना आमच्या संस्थेचे अध्यक्ष यशवंत ठकार हे गोव्यात आले होते. काहीजणांच्या मुलाखतीला ते देखील सोबत आले. यात सारस्वत समाजातील काही मान्यवर व्यक्ती होत्या. कारण यातील काही मंडळींनी २०१२च्या विधानसभा निवडणुकी पूर्वी काही वेगळ्या सूचना केल्या होत्या. आमच्या संस्थेच्या अध्यक्षांनी यशवंत ठकार यांनी मनोहर पर्रीकर यांच्या समोर त्या ‘विशेष’ सूचना मांडल्या होत्या. यात सारस्वत समाजातील काही ‘ओपिनियन मेकर्स’चे असे म्हणणे होते की ‘पर्रीकर स्वतःला नास्तिक असल्याचे भासवतात. गोव्यातल्या बाकीच्या राजकारण्यांचे सतत मंदिरात गेल्याचे, पूजा करतानाचे फोटो येतात पण पर्रीकरांचा असा फोटो कधीच बघायला मिळाला नाही. किमान त्यांना सोवळे घालून पूजा करताना समाज बांधवाना एकदा तरी बघायचे आहे.’ पण हि सूचना पर्रीकरांना मान्य नव्हती. ‘हि मंडळी उद्या आणखी काही करायला सांगतील. मी असले काही करणार नाही.’ असे पर्रीकरांनी ठणकावून सांगितले. ठाकरसरांनी परत काही हा विषय त्यांच्याकडे काढला नाही. पण ठकारसरांनी गोवा भाजपचे कोषाध्यक्ष संजीव देसाई यांच्या कानावर घातले.

संजीव देसाई पर्रीकरांचे जवळचे मित्र देखील होते. त्यानंतर बऱ्याच महिन्यांनी मनोहर पर्रीकरांचे मंदिरात गेल्याचे, पूजा करतानाचे प्रथमच वृत्तपत्रात फोटो येऊ लागले. पर्रा गावातील त्यांच्या मूळ घरी चवथीला सोवळं नेसून गणपतीची पूजा करत असल्याचे फोटो वृत्तपत्रात आले. शिवाय २०१२ ला त्यांच्या हातातल्या गंडयांची संख्या देखील वाढली. हातातले गंडे त्यांनी स्वतः घेऊन कधी बांधले नाही. कार्यकर्त्यांनीच कुठल्या कुठल्या देवस्थानातून आणलेले ते गंडे मोठ्या आग्रहाने त्यांच्या हाताला बांधले होते. कोणी न कोणी, कुठून तरी आणलेले गंडे घेऊन यायचा आणि जबरदस्तीने ते त्यांच्या हाताला बांधून जायचा. ‘माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. पण ती व्यक्ती माझ्यासाठी हा गंडा आणते. तो हातात बांधून घेतल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधानाचे भाव बघण्यासारखे असतात. सुरुवातीला मी त्याला पटवून द्यायला बघायचो की असले गंडे बांधून काही होत नाही आणि ती व्यक्ती मला पटवून देण्यात माझा वेळ खाऊ लागते. त्यात माझा खूप वेळ जातो. त्यावर विश्वास ठेवायचा कि नाही हे शेवटी माझ्या मनावर आहे ना.’ असे त्यांनी एकदा सांगितले होते. आपले मतदार आपल्याबद्दल काय म्हणतात? त्यांचे आपल्याबद्दल मत काय आहे? आपण घेतलेल्या एखाद्या निर्णयाबद्दल लोकांचे मत काय हे त्यांना जाणून घ्यायचे असायचे. शेवटी त्यांच्या स्वभावाला पटायचे तेच ते करायचे. पणजीतील काही महत्वाच्या लोकांशी वेगवेगळ्या मुद्दयांवर चर्चा करायला पाठवले होते त्यात पर्रीकरांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा होता तो ‘कॅसिनो’चा. त्यावेळी हा मुद्दा चांगलाच पेटला होता. पणजीतल्या या ‘मान्यवर’ मंडळींची ‘कॅसिनो’ मुद्द्यावर प्रतिक्रिया काय होती? आणि पर्रीकरांनी त्यावर काय भूमिका घेतली? हे वाचा उद्याच्या लेखात.


मनस्विनी प्रभुणे नायक
https://gathanmala.wordpress.com
https://streetfoodinindia.wordpress.com
https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in कळसुत्री

मनोहर पर्रीकर आणि मायकल लोबो


कळसूत्री भाग ४

मतदारांना नेमके काय अपेक्षित असते? त्यांची कोणती कामे केल्याने ते आमदारांच्या पाठीशी राहतील? याबाबत प्रत्येकाची वेगवेगळी गणितं आहेत आणि प्रत्येक आमदाराची ती पूर्ण करण्याची वेगळी पद्धत आहे. २०१३-१४ मध्ये कलंगुट मधील रस्ते निकृष्ट दर्जाचे, गटारांची परिस्थिती वाईट, रस्त्यावर मोकाट गुरांचा भरणा, तिथल्या आरोग्य केंद्राची परिस्थिती बिकट हे सगळं डोळ्यांना दिसत असूनही कलंगुट मतदारसंघातील मतदारांनी मायकल लोबो यांना सर्वात जास्त गुण का दिले? हा प्रश्न आमच्या सर्वांसमोर होता. मतदार मायकल लोबो यांची तोंड भरून स्तुती करत होते. मतदारांनी त्यांच्याबद्दल सांगताना


१. मतदारांच्या वाढदिवसाला न विसरता घरी केक आणि बुके पाठवतो. त्याच्याकडे सर्व मतदारांच्या वाढदिवसाचा डेटा आहे.


२. कोणाचाही मृत्यू झाला तर तो तिथे सांत्वन करायला पोहोचतो. 


३. हिंदू -ख्रिश्चन धर्मीय मतदारांच्या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असतो.


४. त्याच्या कार्यालयात गेल्यावर तुमचं काम होतं.


५. सर्व शासकीय योजनांची माहिती, त्यांचे फॉर्म त्याच्या कार्यालयात मिळतात.


अशी एकामागे एक कारणे सांगत होते. आपल्या मतदारसंघातला सर्व डेटा तयार करून त्याचा व्यवहारात योग्य उपयोग करतात. अपेक्षित नसताना वाढदिवसाला केक आणि बुके मिळणे याने मतदार भारावून गेले. मतदारांना आमदाराने वैयक्तिकरित्या लक्ष दिलेले आवडले. आमदाराच्या सामाजिक जबाबदारी पेक्षा त्याने मतदारांशी वैयक्तिक संबंध, संपर्क ठेवणे, मतदारांची वैयक्तिक कामे करणे यावर दिलेला भर खुद्द मतदारांनादेखील आवडला. आमदाराने काय पाहिजे ते करावे पण त्याने आमच्याकडे वैयक्तिकरित्या लक्ष द्यावे अशी मतदारांची अपेक्षा होती ती मायकल लोबो पूर्ण करत होते आणि म्हणून त्यांना त्यांच्या मतदारांनी भरपूर गुण दिले. जिथे बाकीच्या आमदारांना मतदारसंघातील संपर्क, मतदारसंघातील कामे, मतदारांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे या मुद्द्यांवर फार कमी गुण मिळाले. 



मायकल लोबोचे ‘रिपोर्ट कार्ड’ आणि त्याचा सगळ्या आमदारांमध्ये आलेला पहिला क्रमांक बघून मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघात देखील हा सर्व्हे करायला सांगितला. आपल्या मतदारसंघातील मतदारांशी त्यांचा उत्तम संवाद असायचा. त्यामुळे आमदारांचे रिपोर्ट कार्ड बनवण्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी पणजी मतदारसंघाचा समावेश केला नव्हता. पण मायकल लोबो यांचे ‘रिपोर्ट कार्ड’ बघून पर्रीकरांना पणजीत हा प्रयोग करून बघावासा वाटला. त्यांचा मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ खूप गाजला. त्यावेळी त्यांची आक्रमक भूमिका खूप गाजली. पण २००५ पासून ते २०१२ पर्यंत मनोहर पर्रीकर सत्तेपासून दूर होते. याकाळात ते वेगवेगळ्या मोर्चा, वेगवेगळ्या चळवळी, खाण प्रश्न, कॅसिनोसारख्या विषयांमुळे सतत चर्चेत होते. त्यांना गोव्यातील सर्वात प्रभावशाली नेता म्हणून लोकांनीच गणले होते. पण प्रत्यक्षात ‘रिपोर्ट कार्ड’ करताना मतदारांनी त्यांना गुण देताना आपला हात आखडता घेतला. मतदारांच्या मते ‘पर्रीकरांमधली आक्रमकता आता त्यांना दिसत नाही. ते थोडेसे मावळ झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ जसा आक्रमकपणे गाजवला होता अगदी त्यापद्धतीने त्यांनी आताही आक्रमक व्हायला हवे. विशेषतः आळशी बनलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांबाबत त्यांनी अधिक कडक भूमिका घ्यायला हवी. सत्तेवर येण्याआधी ज्या मुद्द्यांवर पर्रीकर रस्त्यावर उतरत होते ते मुद्दे आता प्रखरपणे हाताळायला हवेत.’ अशा प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या.

पणजीतील मतदार मनोहर पर्रीकर यांच्याबाबत अधिक चोखंदळ झाले होते. त्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. पणजीतील मतदार त्यांना ‘केक -बुके’ मिळाला म्हणून भाळणारे नव्हते. ते कदाचित कोणत्याही समस्यांसाठी रस्त्यावर उतरणार नाहीत, बोलणार नाही, पण शांतपणे आपले मत नोंदवतील अशा मनोवृत्तीचे. त्यामुळे या रिपोर्ट कार्डमध्ये पर्रीकरांना दुसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले. पण पर्रीकर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वतःचे रिपोर्ट कार्ड मोठ्या गांभीर्याने घेतले. यानंतर त्यांनी पणजी मतदार संघातील काही मोजक्या लोकांची नावे दिली. हि मंडळी सामाजिक – राजकीय मत व्यक्त करणारी मंडळी होती. यात समर्थक – विरोधक दोघेही होते. या मान्यवर व्यक्तींसाठी स्वतःची म्हणजेच खुद्द पर्रीकरांची समीक्षा करणारे प्रश्न त्यांनी दिले. या लोकांशी सविस्तर चर्चा करायला सांगितली. यातून समोर आलेले निष्कर्ष अजून वेगळे होते. पर्रीकरांनी या निष्कर्षांना अतिशय गांभीर्याने घेतले. कारण यात सारस्वत समाजातील महत्वाच्या व्यक्तींनी पर्रीकरांबद्दल प्रखर मत व्यक्त केले होते आणि यामुळे खुद्द पर्रीकरांना आपले व्यक्तिमत्त्वात बदल करायला भाग पाडले.     





मनस्विनी प्रभुणे नायक
https://gathanmala.wordpress.com
https://streetfoodinindia.wordpress.com
https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in कळसुत्री

कटुसत्य

कळसुत्री भाग ३ 

आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ चांगलेच गाजले. अतिशय गुप्तता पाळून या सर्व्हेच्या फिल्डवर्कचे काम केले होते. यात नक्कीच हरणाऱ्या आमदारांच्या बरोबरीने पहिले तीन क्रमांक कोणाचे आहेत? याबाबत भाजप कार्यकारणी काय खुद्द पर्रीकरांना देखील कमालीची उत्सुकता होती. या रिपोर्ट कार्डमध्ये मतदारांना आम्ही त्यांच्या आमदारांना गुण द्यायला लावले होते. हे गुण आमदारांच्या कामगिरीवर अवलंबून होते. आमदारांचा मतदारांकडे असलेला संपर्क, मतदारसंघात केलेली कामे अशा वेगवेगळ्या निकषांवर मतदारांनी आपल्या आमदारांना गुण द्यायचे होते. याची प्रश्नावली बनवताना मजा आली होती. पण हा सर्व्हे एरवी निवडणुकीच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व्हे सारखा नव्हता. आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’ आम्ही शाळेतल्या ‘रिपोर्ट कार्ड’च्या धर्तीवर करायचे ठरवले ज्यात मतदार आपल्या आमदारांना गुण देणार होते. भाजप असा पक्ष आहे जो संघटनात्मक पातळीवर खूप काम करतो. संघटनमंत्री आणि कार्यकारणी सदस्यांचे सर्व पातळीवर बारीक लक्ष असते. या मंडळींसाठी देखील हा सर्व्हे महत्वाचा होता. 


प्रत्यक्ष सर्व्हेक्षण करताना आणखी मजा आली. आमच्यापेक्षा मतदारांनी याची जास्त मजा लुटली. कोणीतरी त्यांच्या दारात पहिल्यांदा आले होते जे त्यांच्या आमदारांच्या कामगिरीवर गुण द्यायला सांगत होते. मतदारांना आपल्या आमदाराची अशी परीक्षा घेताना मजा वाटत होती. प्रत्येक प्रश्नावर त्या मतदारांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी असायची. त्या त्या प्रश्नांवर त्यांच्याकडून मार्मिक प्रतिक्रिया यायच्या. त्यांच्या याच प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या होत्या. पहिल्या टप्प्यात जो सर्व्हे झाला त्यात पणजी मतदारसंघाचा समावेश नव्हता. पण पहिल्या टप्प्यात आलेल्या निकालांमध्ये सर्वात वरचा क्रमांक बघून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पणजी मतदारसंघाचा देखील सर्व्हे करा असे सांगितले. कारण आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये पहिला क्रमांक मिळवणारा आमदार होता मायकल लोबो आणि मतदार संघ होता कलंगुट.

मायकल लोबोचे नाव आणि त्याचे रिपोर्ट कार्ड बघताच पर्रीकरांना यात काहीतरी गडबड आहे असे वाटले. ‘याला इतके गुण कसे मिळू शकतात?’ असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित झाला. एक बरं कि मी स्वतःच या मतदारसंघातल्या फिल्डवर्कला उपस्थित होते आणि लोकांच्या प्रतिक्रिया नोंदवून घेतल्या होत्या. त्यावेळी कलंगुट मतदारसंघातील रस्त्यांबाबत, उघड्या गटारांबाबत कायम ओरडाआरडा व्हायचा. पण प्रत्यक्षात मतदारांशी चर्चा करताना मतदारांना या प्रश्नांबाबत काहीच सोयरंसुतक नव्हते. मतदारांशी उत्तम संपर्क, त्यांच्या घरापर्यंत सगळ्या शासकीय योजना पोहोचवण्याचे काम हे आमदार महाशय करत होते. त्यामुळे मतदारांनी त्यांना तसे गुण दिले ज्यात आम्ही काहीच बदल करू शकत नव्हतो. पर्रीकरांनी कलंगुट मतदारसंघात परत सर्व्हे करायला सांगितला. सर्व्हेसाठी आधी जे बूथ निवडले होते ते सोडून उरलेल्या बूथमध्ये सर्व्हे करा शिवाय मतदारांचे ‘सॅम्पल’ वाढवा अशी सूचना दिली. यावेळी डोळ्यात अधिक तेल घालून काम केले. यावेळी देखील प्रतिक्रियांमध्ये आणि आमदाराला भरभरून मिळणाऱ्या गुणांमध्ये काहीच कमतरता नव्हती. मग या मतदारसंघातील मान्यवर अशा लोकांना भेटून आमदाराला लोकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल सविस्तर चर्चा केली. त्यातून मायकल लोबो यांच्या मतदारसंघाच्या विकासाचे मॉडेल स्पष्ट झाले.

मनस्विनी प्रभुणे नायक 

https://gathanmala.wordpress.com

https://streetfoodinindia.wordpress.com

https://foodandtravel365days.wordpress.com

ReplyReply to allForwardAdd reaction
Posted in कळसुत्री

आमदारांचे ‘रिपोर्ट कार्ड’

कळसुत्री भाग – २

२०१२ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आणि तिथून गोव्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले. आमच्या ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लॅनिंग अँड रिसर्च’ या संस्थेचे काम देखील वाढले. भाजप विरोधात असताना काम करत होतो आता तर भाजप सत्तेवर होती. या सरकारने दोन वर्ष पूर्ण करताच आमच्या संस्थेच्या अध्यक्ष्यांच्या म्हणजेच यशवंत ठाकर यांच्या मनात अतिशय वेगळी कल्पना आली. भाजपच्या मंत्र्यांचे आणि आमदारांच्या कामगिरीचे ‘ऑडिट’ करायचे. सत्तेची अर्धी वाटचाल झाली असताना मंत्री – आमदार यांची कामगिरी कशी आहे? हे लोकांमध्ये जाऊन विचारायचे. हातात पुढचे अडीच वर्ष असताना ‘ऑडिट’ मधून येणाऱ्या नकारात्मक गोष्टी सुधारण्याची संधी सर्वांना मिळेल आणि सरकारची कामगिरी देखील उत्तम होईल हा त्यामागचा हेतू होता. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि भाजपची कार्यकारणी यांना देखील हि कल्पना आवडली. आम्ही देखील शास्त्रीय पद्धतीने ‘सॅम्पल’ काढून, सविस्तर प्रश्नावली तयार करून प्रत्येक मतदारसंघात गेलो. पर्रीकरांना याच्या अहवालाची प्रचंड उत्सुकता होती. यात आमदारांच्या रिपोर्टकार्डची विभागणी  A, B, C मध्ये करण्यात आली. A म्हणजे हमखास जिंकून येणारा, B म्हणजे जिंकण्यासाठी पन्नास टक्के संधी असणारा, आणि C म्हणजे अजिबात जिंकून येणार नाही असा. भरपूर वेळ देऊन, बारीक लक्ष घालून हे सर्व्हेक्षण पूर्ण झाले. सगळे अहवाल पर्रीकर आणि भाजप कार्यकारणीला देण्यात आले. यातील A विभागातील नक्कीच निवडून येणाऱ्या आमदारांना वगळून B आणि C विभागातल्या आमदारांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय झाला. अर्थात यातला आमचा सहभाग संपला होता आणि भाजप कार्यकारणीची भूमिका महत्वाची होती. पण पर्रीकर एवढ्यावर शांत थोडेच बसणार होते! त्यांनी यातील मोजक्या ज्येष्ठ आमदार जे त्यावेळी मंत्री देखील होते त्यांची नावं बाजूला काढली. त्यांच्यासाठी काही मोजके प्रश्न तयार केले. यात सर्वात महत्वाचे दोन प्रश्न होते १. जर तुम्हाला पक्षाने पुढच्या निवडणुकीत तिकीट दिले नाही तर तुम्ही काय करणार? आणि २. तिकीट देऊनही तुम्ही निवडणूक हारला तर तुम्ही पुढे काय करणार? पर्रीकरांनी मला विधानसभेतील कार्यालयात बोलावून हि प्रश्नावली दिली आणि भाजपच्या केंद्रीय समितीने हि प्रश्नावली दिली आहे असे सांगून त्यांच्या मुलाखती घेऊन मला रिपोर्ट दे असे सांगितले. एक लक्षात घ्या त्यावेळी भाजपची दुसरी फळी तयार नव्हती. पुढच्या निवडणुकीत जिंकायचं असेल तर या चांगली कामगिरी नसणाऱ्या आणि हरणाऱ्या आमदारांना बदलायला हवे हे पर्रीकरांनी हेरले होते. त्याचाच एक भाग म्हणून या महत्वाच्या आणि निवडक मंत्री – आमदारांच्या मुलाखती घेण्याचा घाट घातला होता.

या पाच जणांमधील फक्त तिघांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. दोघेजण फाजील आत्मविश्वासात होते. रिपोर्ट कसा खोटा आहे. आम्ही जिंकून येणारच असा दावा करत होते त्यांनी मला मुलाखत देणे टाळले आणि ज्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला. समोर आलेल्या रिपोर्टला गांभीर्याने घेतले. ते त्यावेळी जिंकून आले. यात B विभागात माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे नाव होते, जे त्यावेळी आरोग्यमंत्री होते. वर उल्लेख केलेल्या प्रश्नांना पार्सेकर सरांनी व्यवस्थित उत्तरे दिली होती. ‘मला पक्षाने तिकीट नाही दिलं तरी हरकत नाही. मी माझं काम करत राहणार आणि निवडणुकीत हरलो तर माझी शिक्षण संस्था आहे मी उर्वरित जीवन या संस्थेसाठी देईन. राजकारणातून बाहेर फेकले गेलो तर राजकारणातून निवृत्ती घेऊन माझ्या आवडत्या पेशात उत्तम काम करेन’ अशी त्यांनी उत्तरं दिली होती. पर्रीकरांना सगळा सविस्तर अहवाल दिला आणि माझं काम संपलं. पण हे सगळे विषय डोक्यात राहिले. सत्तेवर येण्याआधी जमिनीवर असणारी राजकारणी मंडळी सत्तेवर येताच कशी बदलतात हे या रिपोर्टच्या निमित्ताने दिसून आलं. पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळालं नाही तर पक्षासाठी संघटनात्मक काम करेन नाहीतर निवृत्ती घेऊन आणि शिक्षण संस्थेत काम करेन असं सांगणाऱ्या पार्सेकर सरांना पुढच्या दीड वर्षात मुख्यमंत्रीपद मिळालं. २०१५ ला मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री झाले आणि त्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्री म्हणून नेमलं. सरांचा पुढचा प्रवास आपल्या सर्वांना माहीतच आहे. या घेतलेल्या मुलाखतींमुळे अनेक संभ्रम तुटले. पर्रीकरांचा धोरणीपणा पटकन कळायचा नाही. ते कळायला वेळ लागायचा.

पाच मधल्या दोघांनी मुलाखत द्यायला टाळाटाळ केली त्यांचं पुढे काय झालं? या प्रश्नाचं उत्तर उरलं ना. ते दोघे पुढे २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत सपशेल हारले. त्यातला एक  राजकारणातून बाहेर फेकला गेलाय आणि दुसरा आजही आमदार आहे. पण त्या रिपोर्ट कार्ड नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला तिकीट मिळालं नाही. राजकारणात कोणाचे कसे नशीब पालटेल हे सांगता येत नाही. एवढे सगळे तुम्हाला सांगितले पण या आमदारांच्या रिपोर्ट कार्डमध्ये सर्वात पहिला क्रमांक कोणी पटकावला असेल? काही अंदाज करता येतोय?… नाही नाही तुम्ही अंदाज करताय तो एकदम चूक आहे. कोण आमदार होता तो ज्याने पहिला क्रमांक मिळवला… हे तुम्हाला उद्या सांगते.

गोमन्तक ७ एप्रिल २०२४




मनस्विनी प्रभुणे नायक
https://gathanmala.wordpress.com
https://streetfoodinindia.wordpress.com
https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in कळसुत्री

आज पर्रीकर असते तर

कळसुत्री भाग १

निवडणुकीचा काळ हा प्रत्येक राजकारणी व्यक्तीसाठी परीक्षेचा काळ असतो. ‘ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास’ असा सर्व ‘पणाला’ लावायचा काळ हाच तो काळ. या काळात कोण ससा तर कोण कासव बनतो आणि हि शर्यत सुरु होते ती अगदी ‘तिकीट’ मिळण्यापासून. गेले महिनाभर तिकिटावरून गोव्यात जे काही आडाखे बांधले जात होते, जी काही वेगवेगळ्या इच्छूक उमेदवारांची नावं पुढे येत होती, ती ऐकून प्रत्यक्ष तिकीट वाटप करणाऱ्या राजकीय यंत्रणांना देखील धक्क्यावर धक्के बसले असतील. एक काळ असा होता कि मनोहर पर्रीकरांची राजकारणातली घोडदौड बघून अनेकांना उगाचंच आपणही राजकारणात यावं असं वाटू लागलं होतं. विशेषतः सारस्वत समाजातल्या अनेक उच्च शिक्षित, व्यावसायिक व्यक्तींना असं वाटायला लागलं होतं  कि ‘पर्रीकरांना राजकारण जमलं तर मला का नाही जमणार’. पण फक्त उच्चं शिक्षित आणि यशस्वी उद्योजक असणं हि त्याकाळी पात्रता नव्हती. पक्षासाठी काय केलं? पक्षाचा कार्यकर्ता आहे का? हे मोजमाप पाहिलं लावलं जायचं. पण आता हे मोजमाप काळाच्या पडद्या आड गेलं आहे.  

तर झालं काय की २०१० महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी काही महिने वातावरण तापू लागलं होतं. तिकीट वाटप दूर होतं. गोव्यात मनोहर पर्रीकर तेव्हा विरोधी पक्ष नेते होते. मुंबईत ते त्यांच्या खासगी कामासाठी आले असता त्याच्या देवनारला एका मित्राच्या घरी मुक्कामाला उतरले होते. हा मित्र मुळचा गोमंतकीय पण व्यवसायासाठी मुंबईमध्ये राहणारा. आमची ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट प्लॅनिंग अँड रिसर्च’ नावाची संस्था २०१२ ला गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाचं नियोजन करीत होती. या कामाच्या नियोजनासाठी पर्रीकरांनी आमच्या टीमला त्या मित्राच्या घरी बोलावलं. आम्ही गेलो तर घरात तो मित्र आणि घरातल्या कामात व्यस्त असणारी त्याची पत्नी होती. या मित्राचा व्यवसाय चांगला भरभराटीस आलेला. आता त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात उतरण्याचे वेध त्याला लागले होते. महाराष्ट्रातल्या दुसऱ्या फळीतल्या भाजप राजकारण्यासोबत त्याची उठबैस होतीच. ‘तुला तिकीट मिळवून देतो’ असं या दुसऱ्या फळीतल्या कोणीतरी राजकीय कार्यकर्त्याने त्याला सांगितल्यापासून तो त्यावेळी पूर्णपणे ‘राजकीय कारकीर्द’ कशी घडवता येईल याची स्वप्न बघू लागला होता.

पर्रीकर घरी आल्याचं निमित्तं बघून त्याच्या पत्नीने पर्रीकरांपुढे ‘याला जरा समजावा, हा राजकारणात जाण्याचं, निवडणूक लढवण्याचं नवं खूळ डोक्यात घेऊन बसला आहे.’ असा विषय छेडला. पर्रीकरांनी हे ऐकताच नाकावर असलेल्या चष्मातून एक कटाक्ष त्या मित्रावर टाकताच आपल्याला कसं तिकीट मिळू शकतंय, आपण कोणाच्या संपर्कात आहोत हे सगळं त्या मित्राने सांगायला सरुवात केली. पर्रीकरांनी त्याचं सगळं बोलणं मध्येच तोडलं. ‘तू अजिबात राजकारणात जायचं नाहीस. तुझा व्यवसाय चांगला चालला आहे त्यातच राहा. चांगला व्यवसाय कर. राजकारण हे तुझं क्षेत्र नाही.’ असं स्पष्टपणे सांगितलं. तरी तो मित्र पुढे काहीतरी स्पष्टीकरण द्यायला लागला तोच पर्रीकरांनी ‘तू ऐकणार नसशील तर मीच इथल्या भाजपला सांगतो कि याला तिकीट देऊ नका’ असं सांगून या विषयाचा तुकडा पडला.

पुढे २०१२च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळी हाच मित्र अनेकदा भाजप कार्यालयात दिसला होता. त्याच्या आणि पर्रीकरांच्या मैत्रीत अंतर आलं नाही. हा तर त्यांचा मित्रच होता पण असे अनेकजण जेव्हा केव्हा तिकिटासाठी म्हणून त्यांच्या मागेपुढे फिरायचे तेव्हा ते त्यांच्या फटकळ स्वभावानुसार त्यांना उडवून लावायचे. सध्याच्या मुख्यमंत्रीनी देखील असा अनुभव घेतला असेल. विशेषतः दक्षिण गोव्यात महिला उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा तर त्यांना सतत आजूबाजूला इच्छूकांची मांदियाळी दिसली असणार. यात बिचाऱ्या अनेकजणींच्या नावाची नाहक चर्चा झाली. काहींनी संधी साधून स्वतःला सोशल मीडियावर मिरवून घेतलं आणि शेवटी तिकीटाची माळ अगदीच अनपेक्षित उमेदवाराच्या गळ्यात पडली. मला कोणीतरी जाणकाराने प्रश्न विचारला ‘आज पर्रीकर असते तर?’ पल्लवी धेम्पे यांना तिकीट मिळू दिले असते का?… फारच महत्वाचा प्रश्न विचारला. आता हे सगळं जर तरचं गणित. पण त्यांनी आपल्या मित्राला जो सल्ला दिला तसाच सल्ला यावेळी दिला असता. ऐकणं न ऐकणं समोरच्याचा हातात आहे.

©️ मनस्विनी प्रभुणे-नायक

गोमन्तक ६ एप्रिल २०२४

Posted in ललित लेखन

द फेदरवेट



या चित्रपटाने एक वेगळा अनुभव दिला. माझ्या मते खेळाडूंवर असलेले चित्रपट फारच अंदाज वर्तवणारे असतात. म्हणजे खेळ – खेळाडू-स्पर्धा -हारजीत असे सगळे क्रमाने त्यात येतेच. चित्रपटाचा उद्देश हा ठरलेला असतो. पण या सगळ्या गृहितीकांना खोटे ठरवणारा ‘द फेदरवेट’ हा समारोपाचा चित्रपट ठरला. दिग्दर्शक रॉबर्ट कोल्डानी आणि पटकथा लेखक स्टीव्ह लॉफ यांनी या चित्रपटाला माहितीपटाच्या शैलीमध्ये सादर केले आहे. दिग्दर्शक रॉबर्ट कोल्डानी यांचा हा पहिलाच चित्रपट. ‘माहितीपट’ बनवण्यात ते प्रसिद्ध. आपल्या पहिल्या चित्रपटाची कथा देखील त्यांनी माहितीपटाच्या शैलीत चित्रित केली आहे.

फेदरवेट हे दोन वेळा ‘फेदरवेट चॅम्पियन’ असलेल्या खेळाडूचे परत मैदानात उतरण्याच्या प्रयत्नांचे वास्तविक जीवनातील काल्पनिक चित्रण आहे. प्रसिद्ध बॉक्सर विली पेपच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. पण म्हणून हा चित्रपट ‘बायोपिक’ सारखा झाला नाही आणि याचे श्रेय पटकथा लेखकाला जाते. पटकथा लेखक स्टीव्ह लॉफ यांनी चित्रपटाच्या कथानकाला माहितीपटाच्या रूपात तयार केले.


नायक विली पेप स्वतः चित्रपटाचा ‘स्टोरीटेलर’ आहे. त्याचाच तोंडून आपल्याला त्याची कथा तो बनवत असलेल्या डाॅक्युमेंटरीच्या निमित्ताने ऐकायला मिळते. त्याच्या आयुष्यातील ‘नॉस्टॅल्जिया’ त्याला भुरळ पडतो. निवृत्ती नंतर स्वतःवर माहितीपट बनवायला आलेल्या टीमसोबत सतत दीर्घ संवाद साधणारा विली आपल्याला वेगवेगळ्या मूडमध्ये भेटत राहतो. खरेतर हि डॉक्युमेंट्री बनत असताना अशा काही घडामोडी घडतात त्यातून तो 42 व्या वर्षी बॉक्सिंग रिंग मध्ये पुनरागमन करण्यास प्रवृत्त होतो.

विली इटालियन अमेरिकन सेनानी होता, जो 2006 मध्ये वयाच्या 84 व्या वर्षी मरण पावला. असे म्हणतात कि बॉक्सिंग रिंग मधली त्याची हालचाल एखाद्या नृत्यांगनाप्रमाणे असायची. त्याच्या या जलद हालचालींना एकप्रकारची लय होती. त्याच्या विरोधकांनी त्याला खाली पाडण्यासाठी अनेक प्रकारची धडपड केली. चित्रपट तांत्रिकदृष्ट्या अतिशय प्रभावी आहे. परंतु भावनिकदृष्ट्या तेवढे प्रभावी चित्रण होत नाही विशेषतः विली आणि त्याच्या वडिलांचे, विली आणि त्याच्या मुलाचे प्रसंग फारच रुक्ष वाटतात. फेदरवेटला माहितीपटाची शैली दिल्यामुळे त्या पद्धतीच्या तपशीलवार दृश्यांची मांडणी करताना चित्रपट व्यक्तिरेखांच्या खुलाशांमध्ये शिरतो. त्यामुळे भावनिक दृश्यांची मांडणी करायला कदाचित इथे वाव राहिला नसावा. द फेदरवेट हा पारंपरिक पद्धतीने मांडणी करत नाही, बायोपिकची साचेबद्ध वाट धरत नाही या कारणांमुळे हा चित्रपट जास्त आवडला.


मनस्विनी प्रभुणे नायक
https://gathanmala.wordpress.com
https://streetfoodinindia.wordpress.com
https://foodandtravel365days.wordpress.com

Posted in ललित लेखन

निर्वासितांच्या समस्या मांडणारा ‘बोस्नियन पॉट’

बोस्नियातील खाण कामगार ज्याला जी भाजी, मांस आणणं शक्य आहे ते कामावर घेऊन येत. सगळे जिन्नस एका भांडयात एकत्र करून ते जमिनीत खणलेल्या खड्यातील निखाऱ्यावर ठेवून शिवाय वरून निखारे घालून आपल्या खाण कामाला जायचे. दुपारच्या जेवणा वेळी येऊन शिजलेलं रस्सा (स्टू) सगळेजण मिळून एकत्र खात. या खतखत्यासारख्या पदार्थाला नाव पडलं ‘बोस्निया पॉट’. हा खाण कामगारांचा पारंपरिक पदार्थ आहे. शेकडो वर्षाची परंपरा याला लाभली आहे. चित्रपटाचा मोंताज सुरु होतो तोच मुळी ‘बोस्निया पॉट’वर केलेल्या माहितीपटाचं काम सुरु असलेल्या दृश्यापासून. मोंताजमधून चित्रपटाचं नाव ‘बोस्नियन पॉट’ का आहे याचा अंदाज येतो. दिग्दर्शक पावो मारिन्कोविच चित्रपटाचा मतितार्थ मोंताजमध्येच सांगून टाकतो. चित्रपटाची कथा -पटकथा खुद्द पावो मारिन्कोविच यानेच लिहिली आहे. या साऱ्या वर्णनावरून तुम्हाला वाटेल कि हा स्वयंपाक, पदार्थ यावर चित्रपट आहे. तर तसं अजिबातच नाही. ‘बोस्निया पॉट’ हा पदार्थ चित्रपटाच्या कथेला अनुसरून प्रतीकात्मकपणे वापरला आहे. बोस्नियन पॉट हि एका निर्वासिताची गोष्ट आहे.



चित्रपटाचा नायक फारूक हा सराजेव्हो युद्धातून पळून येऊन बोस्नियात राहत असतो. लेखक, नाटककार, कवी असलेल्या फारुकला म्हणावं तसं या क्षेत्रात यश मिळालं नाही. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कामगारांच्या वस्तीत तो राहत असतो जिथे त्याच्या लेखनाला फारशी दाद देणारी कोणीही नसतं. इथला त्याचा मित्र वर्ग वेगळाच असतो. मागची बाराहून अधिक वर्ष बोस्नियात राहत असताना त्याला अधूनमधून ‘निवासी परवाना’चे नूतनीकरण करावं लागतं. पण यावेळी त्याच्या निवासी परवान्याचं नूतनीकरण आणि इथूनच चित्रपट वेगळं वळण घेतो. नवीन परवाना मिळवण्यासाठी फारूक ऑस्ट्रियामध्ये आपलं योगदान देत आहे अशा पद्धतीचा पुरावा देणं आवश्यक असतं. यात त्याची नोकरी जाते. नाटक कंपनी चालवणाऱ्या दांपत्याला फारूक भेटतो आणि निवासी परवानाचे नूतनीकरण होऊ शकतं याबद्दल आशा पल्लवीत होतात. आपणच वीस वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक तो या दांपत्याच्या नाटक कंपनीच्या माध्यमातून रंगमंचावर आणू बघतो. एकीकडे नाटक रंगमंचावर येण्यासाठी आणि दुसरीकडे निवासी परवाना मिळवण्यासाठी फारूकला करावी लागलेली धडपड यावर बोस्नियन पॉट आधारित आहे. बोस्नियन पॉट क्रोएशिया, ऑस्ट्रिया आणि बोस्निया आणि हर्झेगोविना यांच्यातील सह-निर्मिती आहे.



अतिशय शांत – संयत अशा फारूकची भूमिका सेनाड बासिक या अभिनेत्यानं संवेदनशीलपणे साकारली आहे. फारूकचे सगळे क्लोजअप शॉट त्याच्या मनात चाललेल्या वादळाला, उदासीनतेला टिपतात. याला आता खरंच निवासी परवाना मिळणार नाही का? फारुकला बोस्निया सोडावं लागणार का? असे प्रश्न आपली पाठ सोडत नाहीत. फारुकसोबत आपण देखील व्याकुळ होऊ लागतो. निवासी परवानाच्या निमित्तानं फारुकची लेखक -नाटककार म्हणून अयशस्वी कारकीर्द पुसली जाऊन, त्याचा स्वतःचा नवा जन्म होतो. सध्या युरोपमध्ये निर्वासितांच्या प्रश्नांनी उग्र रूप धारण केलं असून या निर्वासितांच्या समस्यांना एका संवेदनशील कथेच्या माध्यमातून दिग्दर्शक पावो मारिन्कोविच याने मांडलं आहे.

क्रोएशिया, ऑस्ट्रिया, सर्बिया आदी देशांतील अनेक कामगार आजवर बोस्नियातील खाणींमध्ये काम करायचे. यासाऱ्या खाण कामगारांनी ‘बोस्निया पॉट’सारख्या खाद्यपदार्थाची निर्मिती केली. या पदार्थाला अधिकृत मान्यता देऊन त्याला राज्य पदार्थ म्हणून गौरवण्यात आलं आहे. जिथं निर्वासितांनी, स्थलांतरित लोकांनी निर्मिती केलेल्या पदार्थाला मान्यता मिळू शकते पण त्या निर्वासितांना निवासी परवाना मिळत नाही हि विसंगती फारुकच्या माध्यमातून दिग्दर्शक आपल्याला दाखवतो.


Director
Pavo Marinkovic
Writer
Pavo Marinkovic
Stars
Senad BasicBruna BebicZlatko Buric


मनस्विनी प्रभुणे नायक
https://gathanmala.wordpress.com
https://streetfoodinindia.wordpress.com
https://foodandtravel365days.wordpress.com